झी टॉकीजवर एप्रिल मध्ये धमाकेदार मनोरंजनाची मेजवानी !
नवीन चित्रपटांबरोबरच आता लोकप्रिय नाटकांचाही रसिकांना घेता येणार आस्वाद...
संपूर्णपणे मराठी चित्रपटांना वाहून घेतलेली मराठीतील एकमेव वाहिनी म्हणजेच झी टॉकीज एप्रिल महिन्यापासून आता रसिकांसाठी मनोरंजनाची नवीन मेजवानी घेऊन येत आहे. आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांचा नजराणा झी टॉकीजने आपल्या प्रेक्षकांना घरबसल्या दिला आहे. उदा. नटरंग, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हरिश्चंद्राची फॅक्टरी , हुप्पा हुय्या. अलीकडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांबरोबरच गोंधळात गोंधळ, नवरी मिळे नवऱ्याला, नवरा माझा नवसाचा, जत्रा, अगबाई अरेच्चा असे कित्येक चित्रपट झी टॉकीजवर रसिकांनी अनुभवले. आता झी टॉकीज या चित्रपटांच्या जोडीने गाजलेल्या नाटकांची अनोखी पर्वणी द्यायला सज्ज झाली आहे. 'तिसरी घंटा' या नव्या स्लॉटमधून मराठी नाटकांचा आस्वाद देखील आता झी टॉकीजच्या प्रेक्षकांना घेता येणार आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात , अर्थात एक एप्रिल रोजी, 'एप्रिल फूल' स्पेशल मध्ये दुपारी १२.०० वाजता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांचा धमाल चित्रपट 'एकापेक्षा एक' ; दुपारी ३.०० वाजता भरत जाधव, संजय आणि निर्मिती सावंत यांचा 'खबरदार' ; संध्याकाळी ६.३० वाजता 'अशी ही बनवाबनवी' आणि रात्री ९.३० वा. केदार शिंदेंचा 'मॅड' कॉमेडी असलेला ' ह्यांचा काही नेम नाही' हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
झी टॉकीजवर ब्लॉकबस्टर रविवार, टॉकीज लिमिटेड यांच्याबरोबरच नव्याने सुरु होणाऱ्या मालामाल मंडे, टॉकीज थरार, टॉकीज जल्लोष आणि तिसरी घंटा मध्ये अनेक जुन्या नव्या लोकप्रिय चित्रपट आणि नाटकांचा समावेश असेल. मालामाल मंडे मध्ये 'दे धक्का' ; 'नटरंग' ; 'नवरा माझा नवसाचा' यासारखे नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट दर सोमवारी संध्याकाळी ६.३० वा. पाहता येतील. या स्लॉटची सुरुवात ४ एप्रिल पासून होत असून यातील पहिला चित्रपट मकरंद अनासपुरेचा गाजलेला 'दे धक्का' असणार आहे. तसेच ७ एप्रिल पासून दर गुरुवारी रात्री ९.३० वा. 'टॉकीज थरार' मध्ये गूढ आणि रहस्यमय चित्रपट पाहता येतील. यामध्ये महेश कोठारेंचा 'पछाडलेला'(१४ एप्रिल) ; 'एक रात्र मंतरलेली' (२१ एप्रिल) त्याबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा' (७ एप्रिल) आणि 'मी तुळस तुझ्या अंगणी' (२८ एप्रिल) असे काही चित्रपट पहिल्यांदाच टॉकीजवर दाखवण्यात येणार आहेत. तसेच 'टॉकीज प्रिमीयर' मध्ये एप्रिल महिन्यात संजय नार्वेकर, सई ताम्हणकर, मोहन जोशी यांचा विनोदी चित्रपट 'बे दुणे साडेचार' , रविवार, १७ एप्रिल रोजी दाखवण्यात येणार आहेत.
मराठी माणसाचे नाटक वेड सर्वश्रुत आहेच. हीच गोष्ट लक्षात घेऊन झी टॉकीजवर ३ एप्रिल पासून दर रविवारी सकाळी ८.०० वा. 'तिसरी घंटा' मध्ये लोकप्रिय नाटके दाखवली जातील. एप्रिल महिन्यात प्रशांत दामले, अरुण नलावडे यांचे 'चार दिवस प्रेमाचे' (३ एप्रिल); जितेंद्र जोशीचे 'हम तो तेरे आशिक है' (१० एप्रिल); वैभव मांगले - विशाखा सुभेदारचे 'एक डाव भटाचा' (१७ एप्रिल) आणि निर्मिती सावंत यांचे 'श्यामची मम्मी' (२४ एप्रिल) ही लोकप्रिय नाटके रसिकांना पाहायला मिळतील.