संपूर्णपणे मराठी चित्रपटांना वाहून घेतलेली मराठीतील एकमेव वाहिनी म्हणजेच झी टॉकीज. मराठी चित्रपटप्रेमींसाठी झी टॉकीजवर मे महिन्यांत वेगवेगळ्या चित्रपट महोत्सावांद्वारे रसिकांसाठी बहारदार मनोरंजाची मेजवानी पेश केली जाणार आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल दोन चित्रमहोत्सव रसिकांच्या भेटीस येत आहेत ते म्हणजे "महाराष्ट्र सप्ताह" आणि "मस्त मस्त भरत विक". "महाराष्ट्र सप्ताह" मध्ये महाराष्ट्राची संस्कृती,महाराष्ट्राचा इतिहास उलगडून दाखवणारे चित्रपट १ मे ते ७ मे दरम्यान दुपारी १२.०० वाजता दाखवण्यात येणार आहेत. या सप्ताहाची सुरुवातच महेश मांजरेकर यांच्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' ने होणार असून त्यानंतर 'राजा शिवछत्रपती' (२ मे); 'मराठा तितुका मेळावा'(३ मे); 'शिवरायांची सून ताराराणी (४ मे); विष्णुपंत पागनीस यांचा संत तुकाराम (५ मे); 'शाब्बास सुनबाई'(६ मे)आणि या सप्ताहाची दमदार सांगता करण्यासाठी शनिवार ७ मे रोजी, दुपारी १२ वा.- भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांची अनोखी कहाणी सांगणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवला गेलेला सुपरहिट मराठी चित्रपट "हरिश्चंद्राची फॅक्टरी" दाखवला जाणार आहे.
"मस्त मस्त भरत विक" मध्ये मराठी चित्रपटांचा सुपरस्टार भरत जाधव याचे मस्त चित्रपट २ मे ते ७ मे दरम्यान संध्याकाळी ६.३० वाजता रसिकांना पाहायला मिळतील. यामध्ये जत्रा (२मे) ; पछाडलेला (३मे); ह्यांचा काही नेम नाही (४मे);माझा नवरा तुझी बायको (५मे) ;मुंबईचा डबेवाला (६ मे) आणि भरत, मकरंद यांच्याबरोबरच अशोक सराफ यांची धमाल जुगलबंदी असलेला 'साडे माडे तीन' (७ मे) इत्यादी चित्रपट पाहायला मिळतील.
झी टॉकीजवर मे महिन्यापासून 'एक ब्रेक एक्स्प्रेस' मध्ये दर रविवारी दुपारी ३.०० वा. केवळ एका ब्रेकमध्ये एक लोकप्रिय सुपरहिट चित्रपट सलग पाहायला मिळेल. यामध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (८ मे); अशी ही बनवाबनवी (१५ मे) ; बे दुणे साडेचार (२२ मे) आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२९ मे) हे चित्रपट पाहायला मिळतील.
तसेच टॉकीज प्रिमीअर मध्ये मे मध्ये, आजच्या जमान्यातील तरुणांवर आणि इंटरनेटवरून जुळणाऱ्या लग्नावर भाष्य करणारा "सावरिया डॉट कॉम" हा चित्रपट पाहायला मिळेल १५ मे रोजी दुपारी १२.०० वा.
मे महिना म्हणजे शाळेतील मुलांसाठी धमाल करण्याचा हक्काचा महिना. हे लक्षात घेऊनच झी टॉकीजवर आपल्या छोट्या दोस्तांसाठी काही खास चित्रपट २३ मे ते २८ मे दरम्यान "बाल धमाल चित्रपट महोत्सव" मध्ये दुपारी १२.०० वा. दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये पक पक पकाक (२३ मे); टिंग्या (२४ मे); मिशन चॅम्पियन (२५ मे); जिंकी रे जिंकी (२६ मे); छडी लागे छम छम (२७ मे) आणि एवढंसं आभाळ (२८ एप्रिल) या चित्रपटांचा समावेश असेल.
एप्रिल महिन्यापासून सुरु झालेल्या 'तिसरी घंटा' या सदरात लोकप्रिय नाटकं दाखवली जातात.मे महिन्यामध्ये 'तिसरी घंटा' हे सदर दर शनिवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होईल. यामध्ये हवाहवाई (७ मे) ; शु कुठे बोलयाचे नाही (१४ मे) ; जादू तेरी नजर (२१ मे) आणि चार दिवस प्रेमाचे (२८ मे) ही नाटके दाखवण्यात येतील.
त्याशिवाय टॉकीज थरार, टॉकीज जल्लोष, मालामाल मंडे, संडे ब्लॉकबस्टर या मध्ये देखील अनेक जुने नवे लोकप्रिय चित्रपट दाखवले जातील.