झी टॉकीजवर बाल-धमाल चित्रपट महोत्सव
२३ मे ते २८ मे : छोट्या दोस्तांसाठी संपूर्ण आठवडाभर धमाल चित्रपटांची लयलूट
मे महिना म्हणजे आपल्या छोट्या दोस्तांचा धमाल करण्याचा हक्काचा महिना. संपूर्ण वर्षभर शाळा, क्लासेस आणि परीक्षा या सगळ्यांमधून सुटका होऊन मुक्तपणे आपल्याला हवे ते करण्याचा काळ. अशा या धमाल सुट्टीच्या दिवसांत खास आपल्या छोट्या दोस्तांसाठी झी टॉकीजने आणला आहे - "बाल धमाल चित्रपट महोत्सव" . २३ मे ते २८ मे च्या दरम्यान संपूर्ण आठवडाभर दुपारी १२.०० वा. एकापेक्षा एक मस्त चित्रपट झी टॉकीजवर दाखवण्यात येणार आहेत.
या महोत्सवाची सुरुवात नाना पाटेकर आणि सक्षम कुलकर्णीच्या 'पक पक पकाक' ने होत असून सोमवार २३ मे रोजी हा चित्रपट दाखवला जाईल. नाना पाटेकरची दमदार भूमिका आणि सक्षम कुलकर्णीचा खोडकर चिखलू प्रेक्षकांना चांगलाच भावला होता, तसेच नारायणी शास्त्रीने या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण केले होते. गौतम जोगळेकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
मंगळवार २४ मे रोजी, महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (२००८) चा मानकरी ठरलेला तसेच उत्कृष्ट कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय नामांकने व पुरस्कार मिळवलेला मंगेश हाडवळे दिग्दर्शित , 'टिंग्या' झी टॉकीजवर पाहायला मिळेल. 'टिंग्या' मध्ये प्रमुख भूमिकेत असलेला शरद गोयेकर याला या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'टिंग्या'ची कथा एक शेतकरी, त्याचा मुलगा आणि त्यांचा बैल यांच्या भोवती फिरते. आजारपणामुळे निकामी झालेला बैल कत्तलखान्यात विकण्याचा निर्णय जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा त्याचा मुलगा टिंग्या त्याला विरोध करतो आणि आपल्या लाडक्या बैलाला वाचवायचा हरएक प्रयत्न करतो, अशी टिंग्याची थोडक्यात कथा. पण याचे सुंदर आणि हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते. अजिबात चुकवू नये असा हा सुंदर चित्रपट आहे.
आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे न पेलू शक्यामुळे आलेले नैराश्य तसेच बालपणीचे मोलाचे क्षण हरवल्यामुळे मुलांना होणारा त्रास याचे चित्रण २५ मे रोजी दाखवल्या जाणाऱ्या 'मिशन चॅम्पियन' मध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुबोध भावे, शर्वरी जमेनीस,अनुराग वरळीकर, अतुल परचुरे इत्यादी तगडे कलाकार आहेत.
एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कसा आमुलाग्र बदल घडवू शकतो आणि एका खोडकर मुलाचे आयुष्य कसे मार्गी लावू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'जिंकी रे जिंकी' हा चित्रपट. गुरुवार, २६ मे रोजी हा चित्रपट पाहायला मिळेल. भाऊ गावंडे यांच्या 'प्रकाशाच्या उंबरठ्यावर' या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला असून प्रत्येक शाळेत जाणऱ्या मुलाने पाहायला हवा असा हा चित्रपट आहे.
२७ मे रोजी दाखवला जाणारा छडी लागे छम छम या चित्रपटात देखील आपल्या शिक्षण पद्धतीची आजची स्थिती दाखवण्यात आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यामधले वास्तववादी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळेल.
या चित्रपट महोत्सवाची सांगता २८ मे रोजी दाखवल्या जाणाऱ्या 'एवढंसं आभाळ' या संवेदनशील चित्रपटाने होणार आहे. नवरा बायकोच्या बिघडलेल्या संबंधांचा मुलांवर कसा वाईट परिणाम होतो आणि कशा पद्धतीने तो रुक्ष आणि आक्रमक होत जातो, आतून तुटत जातो याचे अतिशय भावूक चित्रण या चित्रपटातून दाखवले गेले आहे. प्रतीक्षा लोणकर आणि हर्ष छाया हे दोघे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
बाल धमाल चित्रपट महोत्सवातील प्रत्येक चित्रपट केवळ मुलांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी देखील आवर्जून पाहावा असाच आहे. तेव्हा तयार व्हा सुट्टीतील धमाल एन्जॉय करण्यासाठी फक्त झी टॉकीजवर.
No comments:
Post a Comment