झी टॉकीजवर अशोक सराफ फिल्म फेस्टिव्हल
अशोक सराफ यांचा चित्रपट महोत्सव - ३० मे ते ४ जून संध्याकाळी ६.३० वा.
गेली ३५ वर्षांहूनही जास्त काळ आपल्या दमदार आणि अष्टपैलू अभिनयाने हिंदी-मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अक्षरशः गाजवणारा कलाकार म्हणजे अशोक सराफ. एक ताकदीचा अभिनेता म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जातो. एक विनोदी अभिनेता म्हणून जरी ते लोकप्रिय असले तरीही अभिनयातील आपले अष्टपैलुत्व त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधून सिद्ध केलं आहे. ‘पांडू हवालदार’ पासून ते 'एक डाव धोबीपछाड', ' निशाणी डावा अंगठा'पर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अविस्मरणीय पर्व आहे.
अशा या मराठीतील महानायकाला सलाम म्हणून मराठीतील एकमेव चित्रपट वाहिनी म्हणजेच झी टॉकीजने 'अशोक सराफ फिल्म फेस्टिवल' च्या माध्यमातून अशोक सराफ यांचे लोकप्रिय चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी पेश केले आहेत. ३० मे ते ४ जून च्या दरम्यान, संपूर्ण आठवडाभर संध्याकाळी ६.३० वा. हे चित्रपट झी टॉकीजवर पाहता येतील.
या सोहळ्याची सुरुवात अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'साडे माडे तीन' या सुपरहिट चित्रपटाने होत असून तीन भावांच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. अंकुश चौधरी-सचित पाटील या जोडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन सांभाळले होते. तसेच या तिघांशिवाय या चित्रपटात अमृता खानविलकर, सुजाता जोशी, सुकन्या मोने, राहुल गोरे इत्यादी कलाकार मंडळी दिसतील.
३१ मे, मंगळवार रोजी, रंजना, अशोक सराफ, कुलदीप पवार आणि निळू फुले यांचा धमाल चित्रपट 'बिन कामाचा नवरा' पाहायला मिळेल. या चित्रपटातील अशोक सराफ यांनी साकारलेला 'निकम्मा' नवरा आजही लोकांना प्रचंड हसवतो.
गावातील शाळा कशा चालतात आणि एकंदरीतच गावांपासून ते तालुका-जिल्ह्यांपर्यंतच्या शिक्षण संस्थेतील घोटाळेबाज कारभार विडंबनात्मक पद्धतीने दाखवणारा 'निशाणी डावा अंगठा' १ जून, बुधवार रोजी पाहता येईल. अशोक सराफ यांच्या बरोबर निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे इत्यादी तगडी कलाकार मंडळी दिसतील.
२ जून, गुरुवार रोजी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन 'आयत्या घरात घरोबा' हा चित्रपट पाहायला मिळेल. एक वेगळी कथा असलेला मजेदार चित्रपट आजही आवडीने पहिला जातो.
अशोक सराफ यांनी साकारलेला दादा दांडगे केवळ त्यांच्या चाह्त्यानंच नाही तर प्रत्येक चित्रपटप्रेमिला हसवून गेला. एक कुप्रसिद्ध डॉन जेव्हा सुधारायचे ठरवतो आणि एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते याचे धमाल विनोदी चित्रण म्हणजेच 'एक डाव धोबीपछाड'. शुक्रवार ३ जून रोजी हा चित्रपट पाहायला मिळेल. यामध्ये प्रसाद ओक, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, संजय मोने इत्यादी कलाकार असून सतीश राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अजिबात चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
काही चित्रपट असे असतात की ते कितीही वेळा, कुठूनही आणि कधीही पाहू शकतो. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन या तिघांचा 'अशी ही बनवाबनवी' हा असाच एक चित्रपट. कितीही वेळा पहा आणि पोट धरून हसा या वर्गवारीतला. शनिवार, ४ जून रोजी म्हणजेच अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा चित्रपट दाखवून या फेस्टिवलची सांगता केली जाणार आहे.
तेव्हा तयार व्हा अशोक सराफ यांच्या फिल्म फेस्टिवल साठी ३० मे ते ४ जून रोजी फक्त झी टॉकिजवर !
No comments:
Post a Comment